अंबड, प्रतिनिधी: जालना जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अंबड आणि पुण्यातील भोसरी परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक अंबड परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४३१/२०२६ मधील चोरीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच १४ एचजे ०४७९) साडेसावंगी येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी साडेसावंगी येथे शोधमोहीम राबवून संबंधित बालकाला ताब्यात घेतले. पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सुमारे ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली.
यानंतर अधिक सखोल चौकशीदरम्यान संबंधित बालकाने तीन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील भोसरी परिसरातून हिरो होंडा फॅशन मोटारसायकल (एमएच १४ बीवाय ७९४८) चोरी केल्याची कबुली दिली. तपासात ही मोटारसायकल भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ५४९/२०२३ मधील असल्याचे निष्पन्न झाले. सदर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली.
दोन्ही मोटारसायकलींसह एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो अंबड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
