विकसित भारताच्या स्वप्नातील महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी – आमदार शंकर जगताप
परीक्षेतील गुणांसोबत व्यक्तिमत्त्व विकासालाही प्राधान्य द्या – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, दि.१६ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भोसरी येथील इंद्रायणीनगर पीसीएमसी पब्लिक स्कूलमध्ये महापौर रवि लांडगे यांनी तर पिंपळे गुरव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल क्रमांक ५४ मध्ये आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आदर्श केंद्रे बनावीत, हीच आमची भूमिका आहे.
आमदार शंकर जगताप यांनी विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, ज्ञानमंदिरात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या भविष्यातील महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची संख्या, ग्रंथालये आणि शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षेत गुण मिळविणे नसून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हाही असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून शाळांमधील आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांनीही विविध महापालिका शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, शंकुतला धराडे, शाम जगताप, नम्रता लोंढे, माजी नगरसदस्य सागर अंगोळकर, पल्लवी जगताप, विलास मडिगेरी, उपआयुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, पर्यवेक्षक ज्योती तापकीर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
