पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधन शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून सर्व शिक्षक उत्साहाने शाळांमध्ये रुजू झाले आहेत. शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
मानधन शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेत काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार अण्णा बनसोडे यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून पालिका प्रशासनाशी संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियुक्ती प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सन्मानाने रुजू होता आले.
ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका बजावली. अतिरिक्त आयुक्त बगाडे आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीमती ममता शिंदे यांनी विद्यार्थीहित लक्षात घेऊन आवश्यक प्रशासकीय मंजुरी तत्परतेने दिल्याने प्रक्रिया सुरळीत पार पडली.
रुजू झाल्यानंतर मानधन शिक्षकांनी एकत्र येऊन आमदार अण्णा बनसोडे यांचे आभार मानले. त्यांच्या मध्यस्थीमुळे नियुक्ती वेळेत झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. तसेच अतिरिक्त आयुक्त बगाडे आणि उपआयुक्त श्रीमती ममता शिंदे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि शाळांचा निकाल अधिक उत्कृष्ट करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला. “आमदार अण्णा बनसोडे आणि पालिका प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मानधन शिक्षकांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून पगारवाढ न झाल्याने मानधन शिक्षकांनी वेतनवाढीची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असल्याचे सांगत आमदार अण्णा बनसोडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले असून किमान वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. महापौर आणि शिक्षण सभापती यांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी शिक्षकांना दिली.
यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीमती ममता शिंदे यांनीही शिक्षकांना आश्वस्त केले. मानधन शिक्षकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभाग सकारात्मक असून लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत तांत्रिक व प्रशासकीय प्रश्नांवर चर्चा करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मानधन शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न वेळेत मार्गी लागल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली आहे.
