‘क वर्ग ते अ वर्ग’ समावेशाचा प्रस्ताव दप्तरी जमा; चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होलीकरांना दिलासा
पिंपरी, दि. १५ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या भागांचा करप्रणालीतील ‘क वर्ग’मधून ‘अ वर्ग’मध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव अखेर महापालिका प्रशासनाने दप्तरी जमा केला आहे. नगरसेवक विकास नामदेव साने यांनी या प्रस्तावाविरोधात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो नागरिकांना संभाव्य करवाढीपासून दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या ५ मे २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक विकास साने यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शविला होता. संबंधित भागांमध्ये अद्यापही अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना नागरिकांवर अतिरिक्त कराचा भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले होते.
यावेळी त्यांनी महापालिकेच्या आर्थिक कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती, विविध विभागांतील अनावश्यक खर्च आणि निधीच्या नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी करवाढीचा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
साने यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने अखेर संबंधित प्रस्ताव दप्तरी जमा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून समाधान व्यक्त केले जात आहे.
“चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली परिसरातील नागरिकांवर अन्यायकारक करवाढ लादण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. आवश्यक सुविधा न देता करवाढ करणे योग्य नव्हते. हा विजय माझा नसून या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे. नागरिकांच्या हिताविरोधात जाणारा कोणताही निर्णय आम्ही खपवून घेणार नाही. भविष्यातही नागरिकांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी माझा संघर्ष सुरूच राहील.”
……विकास साने.नगरसेवक पिंपरी चिंचवड
महापालिका प्रशासनाने प्रस्ताव दप्तरी जमा केल्याने विकास साने यांच्या भूमिकेला बळ मिळाले असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
