लातूर प्रतिनिधी : बळीराजाच्या अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका संपण्याचे नाव घेत नाहीये. लातूर जिल्ह्यातून अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि शेतकरी कुटुंबाच्या दुरवस्थेचे विदारक दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे.एका गरीब शेतकरी कुटुंबातील बैल वीज पडून दगावल्याने,नवीन बैल खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अखेर शेतकरी माऊलीला स्वतःबैलाच्या जागी नांगराला जुंपून घेऊन शेती मशागत करावी लागत आहे.
नेमकी घटना काय?
लातूर जिल्ह्यातील *देवणी तालुक्यातील बांबळी (बु.)* येथील शेतकरी *काशिनाथ गायकवाड* यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या विजेमुळे गायकवाड यांच्या हक्काचा आणि शेतीच्या कामाचा मुख्य आधार असलेला एक बैल दगावला.
नवीन बैल घेण्याची ऐपत नसल्याने उद्विग्न पाऊल
ऐन पेरणी आणि शेती मशागतीच्या दिवसांत बैल दगावल्याने गायकवाड कुटुंबासमोर आभाळच फाटले. आजच्या घडीला नवीन बैल खरेदी करण्यासाठी बाजारात हजारो रुपयांची गरज असते. मात्र,अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातात दमडीही नसल्याने नवीन बैल विकत घेणे या कुटुंबाला अशक्य झाले.शेतीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल,याच चिंतेपोटी अखेर काशिनाथ गायकवाड यांच्या *पत्नीने स्वतःला नांगराला जुंपून घेतले.* एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः उभे राहून त्या शेताची नांगरणी व मशागत करत आहेत.
व्यवस्थेच्या भीषण वास्तवावर कोरडे
हे विदारक दृश्य केवळ एका शेतकरी कुटुंबाची वैयक्तिक वेदना नसून, देशातील आणि राज्यातील शेती व्यवस्थेचे भयावह वास्तव समोर आणणारे आहे.शेतमालाला योग्य भाव न मिळणे,सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटली जाणारी शेतकरी कुटुंबे आज कोणत्या थराला गेली आहेत,याचे हे जिवंत उदाहरण आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेपुढे हतबल झालेला बळीराजा आज आपल्याच शेतात रक्त आटवताना दिसत आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटना मदतीसाठी सरसावली
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेत्यांनी आणि संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. *क्रांतिकारी शेतकरी संघटनेने* या पीडित गायकवाड कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
“ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील,”अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणि सरकार खडबडून जागे होऊन या हतबल शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि नवीन बैलजोडी उपलब्ध करून देणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.