मृतांचा आकडा सातवर; तीन जणांवर उपचार सुरू
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; आठ आरोपी ताब्यात, गुन्हे शाखेकडे तपास
पिंपरी-चिंचवड : शहरातील फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. दापोडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अवैध दारू विक्रीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दि. २८ मे २०२६ रोजी फुगेवाडी परिसरात चार इसमांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती दापोडी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासादरम्यान संबंधितांनी विषारी दारूचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत अवैध दारू विक्रीच्या साखळीचा शोध सुरू केला.
या प्रकरणी दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ११४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), १२३ (गुन्हा करण्याच्या उद्देशाने अपायकारक पदार्थाद्वारे इजा करणे), १२५ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारी कृती), २७५ (अपायकारक पेय विक्री) आणि ३(५) यांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई), ६८, ८१ आणि ८३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. अशा प्रकारे एकूण आठ आरोपी सध्या पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत. विषारी दारूची निर्मिती, साठवण, पुरवठा आणि विक्री यामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.
दरम्यान, उपचार घेत असलेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर फुगेवाडी तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. गुन्हे शाखेकडून आरोपींची चौकशी, दारूचा स्रोत, त्यामध्ये वापरण्यात आलेली रसायने आणि इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे. तसेच शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे संकेतही पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शहरातील अवैध मद्यविक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी अशा अवैध धंद्यांविरोधात माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.