पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील १०८ ॲस्टोरिया साईट बांधकाम ठिकाणी बेकायदा आणि निष्काळजीपणे ब्लास्टिंग केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत बबलू शेख (वय ३५) हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
Ravet परिसरातील गुकाई चौक ते भक्तीशक्ती चौक नवीन बीआरटी रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई दशरम बवन सदगीर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशिकांत राघवशरण श्रीवास्तव (वय अंदाजे ५५, ताथवडे) आणि सचिन शंकर चव्हाण (वय अंदाजे २३, कुरुळी) यांनी बांधकाम साईटवर ब्लास्टिंगसाठी कोणतीही वैध परवानगी घेतली नव्हती. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस सहआयुक्तांच्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करून २५ मे रोजी कंट्रोल ब्लास्टिंग करण्यात आले.
ब्लास्टिंगनंतर छिद्रांमधील जिलेटिन कांड्यांचा पूर्ण स्फोट झाला की नाही, याची खातरजमा न करता आणि आवश्यक सुरक्षा उपाय न अवलंबता कामगाराला पुन्हा त्याच ठिकाणी ड्रिल मशीनने छिद्र पाडण्यास सांगण्यात आले. त्यावेळी अचानक स्फोट होऊन कामगार बबलू शेख यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८८ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.