जालना प्रतिनिधी…..भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर भोकरदन पोलिसांनी शनिवारी (दि. २३) दुपारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नीसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून ३५ हजार ६८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील गजानन मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बाहेरील जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी सुमारे २.४५ वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत गणपत रामधीन सेठी (वय ५४), गितांजली गणपत सेठी (वय ५१, दोघे रा. राजूर, ता. भोकरदन) तसेच जागा मालक ज्ञानेश्वर विनायक वाघ (रा. भोकरदन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाडीदरम्यान पोलिसांनी पीडित महिलांची सुटका केली असून घटनास्थळावरून रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे, आरोपी पती-पत्नीविरुद्ध यापूर्वीही हसनाबाद पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (PITA) अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेंधबिर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पीएसआय पवन राजपूत व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाने करीत आहेत.
