आयएएस पती आणि आयपीएस पत्नी एकाच जिल्ह्यात सेवेत
सोलापूर प्रतिनिधी……वृष्टी जैन यांनी सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त पदाचा अधिकृत पदभार सोमवारी स्वीकारला. यामुळे सोलापूरच्या प्रशासकीय व पोलीस वर्तुळात एका सनदी अधिकारी दाम्पत्याची विशेष चर्चा रंगली आहे.
वृष्टी जैन या यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. महाराष्ट्र कॅडरच्या २०२२ बॅचच्या आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीची छाप पाडली आहे.
विशेष म्हणजे त्यांचे पती कुशल जैन हे देखील २०२२ बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यात प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी या पती-पत्नीच्या खांद्यावर आली आहे.
कुशल जैन यांच्याकडे ग्रामीण विकास व जिल्हा परिषद प्रशासनाची धुरा असताना, वृष्टी जैन या सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत. एकाच जिल्ह्यात आयएएस आणि आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हे दाम्पत्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्य शासनाने त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीची दखल घेत सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे. या नियुक्तीनंतर विविध स्तरांतून या सनदी अधिकारी दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोलापूरच्या विकास आणि प्रशासनात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
