पिंपरी-चिंचवड, दि. २५ मे २०२६ — देहूरोड परिसरातील नखाते कॉम्प्लेक्स येथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकावर फरशी फेकून मारहाण केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नवनाथ जगन्नाथ मोरे (वय ४५, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी आदित्य डोलारे (वय २०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, एम.बी. कॅम्प, देहूरोड) व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५/०५/२०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोरे हे नखाते कॉम्प्लेक्स येथे ड्युटीवर होते. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे आले. एक महिन्यापूर्वी स्मशान परिसर खाली करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादींवर फरशी फेकून हल्ला केला. या हल्ल्यात मोरे यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस तसेच छातीवर दुखापत झाली.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.