पुणे…..देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत इंधन दरात चार वेळा वाढ करण्यात आली असून सोमवारी झालेल्या ताज्या दरवाढीत पेट्रोल प्रतिलिटर २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.१७ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात एकूण ७.३८ रुपये आणि डिझेलच्या दरात ७.०९ रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला होता. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने दरवाढ सुरू केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि खाद्यतेलाची बचत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आगामी काळात इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सततच्या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार असून मालवाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी मोठा फटका बसणार आहे.
