पुणे प्रतिनिधी | लाँग माउंटन, मॉरिशस…..लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मॉरिशसमध्ये आयोजित भव्य समारंभात मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मवीर गोकुळ यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. हिंदी प्रसारणी सभेद्वारे संचालित लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारात हा सोहळा पार पडला. याचवेळी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्येही लोकमान्यांच्या आणखी एका अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला वाहिलेल्या या कार्यक्रमाने भारत आणि मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित केले. १९२६ साली स्थापन झालेल्या हिंदी विद्यालयाला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात आले होते. त्या ऐतिहासिक निर्णयाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन हिंदी प्रसारणी सभेच्या अध्यक्षा रोहिणी रामरूप यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या प्रसंगी मॉरिशसचे शिक्षणमंत्री महेंद गुंगाप्रसाद आरोग्य व कल्याणमंत्री अनिलकुमार बच्चू, संस्कृतीमंत्री महेंद्र गोंगीया, भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक विचार मंच आणि शैलेश टिळक यांनी दोन्ही संस्थांना लोकमान्यांच्या प्रतिमा भेट दिल्या. कार्यक्रमाला लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक, पणती अंजली रहाळकर,खापरपणतू व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक कुणाल टिळक आणि श्रुतिका कुणाल टिळक उपस्थित होते. या अर्धपुतळ्यांची निर्मिती शिल्पकार विवेक खटावकर यांचे पुत्र विपुल खटावकर यांनी केली.
यावेळी राष्ट्रपती धर्मबीर गोखूल यांनी आपल्या भाषणात हा कार्यक्रम भारत आणि मॉरिशस यांच्यातील “जिवंत पूल” असल्याचे सांगितले. हिंदी भाषेचे जतन आणि संवर्धन हे भारतीय संस्कृतीच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “भाषा टिकली तर संस्कृती टिकते,” असे सांगत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या मॉरिशस दौऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले. मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांचे अनावरण हे भारत-मॉरिशस संबंधांच्या दृढतेचे आणि लोकमान्यांच्या अमर वारशाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय वंशाच्या मोठ्या मॉरिशियन समाजामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील नाते अधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त झालेला हा सोहळा हिंदी प्रसारणी सभा तसेच मॉरिशसमधील भारतीय वंशीय समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांचे विशेष अभिनंदन केले.
“लोकमान्यांच्या विचारांचा जागतिक सन्मान; मॉरिशसमध्ये शताब्दी वर्षानिमित्त भव्य अभिवादन” अशी भावना या सोहळ्यातून व्यक्त झाली.
