पिंपरी-चिंचवड : रहाटणी येथील नखाते वस्ती परिसरात भरधाव वेगातील ॲक्टिव्हा मोपेडचा अपघात होऊन एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास मॅट्रीक्स सायन्स अॅकेडमी, रहाटणी, नखाते वस्ती येथे घडली. शुभम पंढरीनाथ म्हस्के (वय १८, रा. गणेशनगर, चिंचवडगाव) हा त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा (एमएच १४ केएक्स ३९५५) ही मोपेड भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत असताना अपघात झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलीस शिपाई निलेश सोपान कदम यांनी फिर्याद दिली असून काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मसपोनि कोरडे करीत आहेत.