मावळ…मावळ तालुक्यातील गहुंजे येथील साईनगर परिसरात किरकोळ वादातून तिघांनी तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला करून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास साई रेसिडेन्सीसमोरील मैदानात, साईनगर, गहुंजे येथे घडला. याप्रकरणी प्रेमराज केशव सोळंकी (वय २८, रा. साई रेसिडेन्सी, गहुंजे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात नागेश जगले, अभिषेक जगले आणि योगेश दडस या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११०, ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील नागेश जगले याने मैदान रिकामे करण्याच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली. त्यास जाब विचारला असता त्याने धक्काबुक्की करत “मी साईनगरचा भाई आहे” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने हातातील लाकडी दांडके फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्याचवेळी अभिषेक जगले व योगेश दडस यांनी फिर्यादीवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर नागेश जगले याने फिर्यादीच्या पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच डोक्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो वार चुकविल्याने तो पाठीवर बसल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादीच्या मानेवर व चेहऱ्यावर नखाने ओरखडे काढण्यात आले. फिर्यादीच्या आईलादेखील धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन पुन्हा शिवीगाळ केली व घराचे गेट तोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.