विठ्ठलनगर पुनर्वसन, पिंपरी येथे भीमजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न
पिंपरी, दि. २१ मे २०२६ : “माणसांपेक्षा दगडांना अधिक महत्त्व देणारा समाज वाढत असल्याने खऱ्या वारकरी विचारांचा पराभव होत आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समता, शांती, बंधुता आणि न्याय. माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार होते,” असे प्रतिपादन प्रबोधनकार किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले.
विठ्ठलनगर पुनर्वसन, पिंपरी येथे सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कीर्तनात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, ललिता बनसोडे, सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे आणि कौसल्या पंडित यांनी केले.
यावेळी नगरसेवक राहुल भाऊ भोसले, नगरसेविका वैशालीताई घोडेकर (लोंढे), ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, साम टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार गोपाल मोटघरे, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के, रोहित खरगे, अविनाश कांबीकर, माऊली भोसले, युनूस खतीब, विकास गायकांबळे, देवा भालके, भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, मुख्याध्यापक आल्हाट, अभिमान सोनवणे, युवराज भास्कर, सैलाजात चौधरी, उर्वशी गाढवे आदी उपस्थित होते.
कीर्तनादरम्यान वाबळे महाराज म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा लाभली आहे. महात्मा फुले हे जगद्गुरू तुकोबारायांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या मार्गावर चालले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या विचारांचा वारसा जपत परकीय सत्तांचा पाडाव करून बहुजन समाजाला स्वराज्य दिले.
ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांवर भाष्य न करता गीतेवर ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, कारण गीता त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या धम्मपदासारखी वाटली. “तु मन हे मीचि करी, माझिये भजनीं प्रेम धरी” या ओवीचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी ‘भजन’ म्हणजे केवळ टाळ वाजवणे नव्हे, तर समाजसेवा असल्याचे सांगितले.
“बाबासाहेब विलायतला गेले, पण त्यांनी कधी तंबाखू किंवा पानाच्या व्यसनाला स्पर्श केला नाही. त्यांचे आचरण शुद्ध होते, म्हणूनच समाज सुधारला. ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचा परमार्थ, राजकारण किंवा समाजकारणही शुद्ध असू शकत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
“जे पंचशीलाचे पालन करतात तेच खरे धम्माचे लोक आणि तेच खरे वारकरी आहेत. देव दगडात किंवा मूर्तीत नसून तो माणसाच्या सत्य आचरणात आणि चांगल्या चरित्रात असतो,” असा संदेश देत त्यांनी संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांशी जोडलेला संवाद आणि ‘गुरु ग्रंथ साहिब’मधील त्यांचे स्थान याचाही उल्लेख केला.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, “मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले होते. मात्र जातीभेद जाणवल्यानंतर त्या प्रवाहातून बाहेर पडून समाजहिताच्या चळवळीत सहभागी झालो. संयुक्त जयंतीचा हा कार्यक्रम समाजाला निश्चितच दिशादर्शक ठरेल.”
कार्यक्रमात राईबाई वाघमारे, मस्के मामी, रानुबाई किसन डोंगरे, शिलाबाई अभिमान सोनवणे, मंदा वाळके, आशावर्कर मिराताई वाघमारे आणि सुवर्णा कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या प्रसंगी विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
