आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे यांच्या निलंबनाची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड, दि. २० मे २०२६ – प्रभाग क्रमांक २७ मधील राहटणी-काळेवाडी परिसरातील नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्लास्टिक व कचऱ्यामुळे अनेक नाले तुंबल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी अतुल सोनवणे यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.
पावसाळा तोंडावर असताना नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा दावा दाखले यांनी केला. “नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही आरोग्य विभागाने कोणतीही प्रभावी कारवाई केलेली नाही. कंत्राटदारांना पाठीशी घालून निष्काळजीपणा केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“स्वच्छ पिंपरी-चिंचवडचा नारा देणारे प्रशासन प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य चालवत आहे. कोट्यवधींची नालेसफाईची कामे केवळ कागदावरच होत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असेही युवराज दाखले यांनी म्हटले आहे.
शिवशाही व्यापारी संघाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत
*आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करावी.
*४८ तासांत प्रभागातील सर्व नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करावी.
*संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
दरम्यान, “तीन दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेनेच्या वतीने आरोग्य विभागाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल. तसेच महापालिका गेटसमोर नाल्यातील कचरा टाकून निषेध व्यक्त केला जाईल,” असा इशाराही युवराज दाखले यांनी दिला.
