पिंपरी, दि. २० मे : पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीने मानसिक नैराश्यातून ही कृती केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
आशिष जमदाडे पाटील (रा. चिखली) असे धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन करून महापौरांना मारण्याची धमकी दिली होती.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासले. त्यानुसार चिखली परिसरातून त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भोसरी पोलीस ठाणे येथे चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान आशिष जमदाडे पाटील याने मानसिक नैराश्यातून फोन केल्याची कबुली दिली. तसेच नातेवाईक व स्थानिकांकडून माहिती घेतल्यानंतर त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला समज देऊन घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
