तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेत; मुंबई-नाशिकसह अनेक वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्याच्या गृह विभागात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाचा तपास करत असून, या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुखपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच कायम राहणार असल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिस दलात मोठे बदल
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ स्तरावरही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनोजकुमार शर्मा यांची कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कुंभारे हे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असतील.
तसेच सुवेझ हक यांच्याकडे प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली असून सत्यनारायण चौधरी यांची वाहतूक विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राजेश प्रधान यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दत्ता कराळे यांची बदली चर्चेत
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरण, इगतपुरी कॉल सेंटर आणि ४०० कोटींच्या कंटेनर प्रकरणामुळे दत्ता कराळे चर्चेत आले होते.
अशोक खरात यांच्यासोबतचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांनीही यासंदर्भात आरोप केले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचीही बदली करण्यात आली होती. आता दत्ता कराळे यांच्या बदल्यामुळे नाशिक पोलिस प्रशासनात सलग मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे.