दोन ठिकाणची अनधिकृत पत्राशेड व बांधकामे जमीनदोस्त; १,४५० चौ. फुटांचे अतिक्रमण हटविले
पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच भाग म्हणून क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ९ मधील अजमेरा सोसायटी रोड आणि नेहरूनगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ठिकाणची सुमारे १ हजार ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त क्रमांक २ तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘क’ क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे, सौरभ शिरसाठ, इम्रान पठाण आणि दत्तात्रय छडीदार यांच्यासह १९ एमएसएफ जवान, सहा मजूर, एक जेसीबी आणि एका क्रेनच्या साहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली.
शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईचा वेग वाढविला असून, अनधिकृत बांधकामधारकांमध्ये या मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे.
