गुरुकुलम संस्थेसाठी आरक्षण हटविण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्याची महापौर, आयुक्तांसह सर्वपक्षीय नेत्यांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : मोशी येथील गट क्रमांक ३२७ मधील तब्बल १५ हेक्टर अर्थात सुमारे ३७ एकर जागेवरील विकास आराखड्यातील दोन महत्त्वाची सार्वजनिक आरक्षणे रद्द करून ती जागा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आदिवासी आश्रमशाळा या निवासी शैक्षणिक संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रस्ताव मोशीतील करदात्या नागरिकांवर अन्याय करणारा असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो बहुमताने फेटाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांना लेखी निवेदन दिले आहे.
मोशी येथील गट क्रमांक ३२७ (जुना गट क्रमांक ३२५) मधील १५ हेक्टर जागेवर मंजूर विकास आराखड्यानुसार ‘रिक्रिएशनल कॉम्प्लेक्स’ अर्थात मनोरंजन संकुल आणि जलाशय अशी महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरक्षणे आहेत. मात्र, ही दोन्ही आरक्षणे वगळून संबंधित जागा निवासी शैक्षणिक संस्थेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये विकास आराखड्यात फेरबदल करण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.
भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आणि विद्यार्थिसंख्येचा विचार करता तब्बल ३७ एकर जागा देण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न निर्माण होतो. संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी जागेची गरज असल्यास पीएमआरडीए, महाराष्ट्र शासन किंवा गायरान जमिनीमधून एक-दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मोशीतील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेली एवढी मोठी जागा आरक्षणमुक्त करणे योग्य नाही.
आज राज्यात आणि देशात आदिवासी, मागासवर्गीय तसेच विविध समाजघटकांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. भविष्यात अशा प्रत्येक संस्थेने जागेची मागणी केल्यास महापालिका जनहिताची आरक्षणे रद्द करून जागा देणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास भविष्यात सार्वजनिक आरक्षणांच्या संरक्षणाबाबत चुकीचा पायंडा पडू शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मोशीतील नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे आणि ३७ एकर जागेवरील सार्वजनिक आरक्षणे कायम ठेवावीत, अशी ठाम भूमिका भापकर यांनी मांडली आहे.
‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावणार आहे!’ अशा शब्दांत भविष्यातील परिणामांकडे लक्ष वेधत, मोशीतील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांवर गदा आणणारा हा प्रस्ताव महापालिका सभेने बहुमताने फेटाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
