एका दिवसात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद; बांधकाम व्यावसायिकांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…..पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. चाकण, महाळुंगे एमआयडीसी, भोसरी, हिंजवडी, देहूरोड आणि बावधन परिसरात विविध घटनांप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, लोखंडी रॉडने मारहाण, बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू, महामार्गावरील अपघात, हुक्का पार्लरवर कारवाई आणि तब्बल १५ कोटी ४० लाख रुपयांच्या कंपनी साहित्याच्या अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
१. चाकणमध्ये पत्नीबाबतच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेदनकरवाडी येथील गवतेवस्ती परिसरात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
अमिनुल हक अब्दुल बारक (वय २३) याच्याकडे आरोपी शाहिजुद्दीन इस्लाम (वय २२) याच्या पत्नीबाबत वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपीने अमिनुल याच्या चेहरा, डोके आणि खांद्यावर धारदार किंवा अन्य हत्याराने जीव घेण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. जेवण करताना मागून येऊन लोखंडी रॉडने हल्ला
महाळुंगे एमआयडीसी दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथील सारासिटी परिसरात मारहाणीची घटना घडली. मोहन राजेभाऊ गेटुळकर (वय २१) हे आई तुळजा खानावळ येथे जेवण करत असताना अक्षय लक्ष्मण पोपळपट (वय ३०) याने अचानक मागून येऊन लोखंडी रॉडने त्यांच्या कपाळावर आणि मानेवर वार केल्याची फिर्याद आहे.
या हल्ल्यात मोहन यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून चार टाके पडले आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३. पार्किंगच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांकडून मारहाण
भोसरीतील भगतवस्ती येथे हनुमान मंदिराजवळ पार्किंगच्या कारणावरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली. समीर जन्नत अली अन्सारी (वय २०) हे आपल्या भावासोबत टेम्पोमधून स्क्रॅप खरेदीसाठी गेले होते. टेम्पो पार्क करण्यासाठी मोटारसायकल बाजूला घेण्याच्या कारणावरून अनिस राजपूत, त्याचे वडील रणजित राजपूत, आजोबा राजबहादूर राजपूत आणि एका अनोळखी तरुणाने संगनमत करून फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि वडिलांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
तसेच लेथ मशीनच्या दुकानात नेऊन लोखंडी पाईपने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या पाठीवर वार करण्यात आले. या घटनेत तिघेही जखमी झाले आहेत. भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४. कंपनीला तब्बल १५ कोटी ४० लाखांचा गंडा; दहा जणांविरोधात गुन्हा
औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा आर्थिक अपहाराचा प्रकार उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. वासुली येथील अॅडव्हिक ग्रुप ऑफ कंपनीजमधील अॅल्युमिनियम साहित्याचा तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे स्टोअर ऑफिसर योगेश मकवाना आणि लहाणू पुणेकर यांनी कंत्राटी कामगार तसेच व्हेंडर कंपनीच्या प्रतिनिधीच्या मदतीने विश्वासाने सोपविलेल्या साहित्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात येणारे चांगले मटेरियल, स्क्रॅप आणि अन्य साहित्य ट्रान्सपोर्ट चालकांच्या मदतीने बाहेर काढून स्क्रॅप व्यावसायिकांना विकल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणात स्टोअर अधिकारी, कंत्राटी कामगार, व्हेंडर प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट चालक आणि स्क्रॅप व्यावसायिक अशा दहा जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अपहारित असल्याची माहिती असूनही काही स्क्रॅप व्यावसायिकांनी हे साहित्य खरेदी केल्याचा आरोप आहे.
५. बांधकाम साईटवर सुरक्षेचा अभाव; २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू
हिंजवडी पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारुंजी येथील संत तुकारामनगर परिसरातील बांधकाम साईटवर १४ नोव्हेंबर रोजी चौथ्या मजल्यावर काम करताना महेश रामराव राठोड (वय २३) यांचा तोल जाऊन ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
बांधकाम साईटवर संरक्षक जाळी, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप आहे. बांधकाम व्यावसायिक संतोष माणिक राठोड आणि ठेकेदार अमोल दिलीप चव्हाण यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६. किवळे येथे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळे येथील एक्स्प्रेस वेवर १६ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास हायवा वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
हायवा चालकाने वाहतुकीचा विचार न करता भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने संजय शिंदे यांचे मित्र सतीश हिंदुराव शिंदे यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी संजय शिंदे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी हायवा चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७. भुगावमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई; ६८ हजारांचे साहित्य जप्त
बावधन पोलिसांनी भुगाव रोडवरील कोकोरीको स्टॅक बार अँड किचन येथे कारवाई केली. हॉटेलमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या हुक्का साहित्य ग्राहकांना पुरविण्यासाठी ठेवल्याचा प्रकार समोर आला.
या कारवाईत मोहम्मद शोएब अन्सारी (वय ३२) आणि पंकज भुवन जोशी (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ११ हुक्क्याचे पॉट, प्रतिबंधित फ्लेवर्स आणि अन्य साहित्य असा एकूण ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हॉटेलमध्ये शेगडी पेटवून आग प्रतिबंधक सुरक्षेबाबतही निष्काळजीपणा केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
एकाच कालावधीत समोर आलेल्या या घटनांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षा, बांधकाम कामगारांचे संरक्षण, वाढती हिंसक प्रवृत्ती आणि आर्थिक गुन्हेगारी यांसारखे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.
