दोषींवर कठोर कारवाईसाठी फौजदारी तक्रार अर्ज; दुर्घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) : मोशी येथील कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी फौजदारी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची भूमिका घेत वाघेरे यांनी पिंपरी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हा अर्ज सादर केला आहे.
दि. ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपो परिसरात ही भीषण दुर्घटना घडली होती. कचऱ्याचा मोठा ढिगारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला, तर १४ कामगारांची सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर १३ जुलै रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मात्र, केवळ प्राथमिक कारवाई करून हे प्रकरण थांबवू नये. दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांची भूमिका तपासली जावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्था, कचरा व्यवस्थापनाची कार्यपद्धती, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय देखरेख यांची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या दुर्घटनेबाबत वाघेरे यांनी यापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तक्रार अर्ज व निवेदने सादर केली होती. मात्र, सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करून ठोस कायदेशीर कार्यवाही व्हावी, या उद्देशाने त्यांनी आता न्यायालयीन लढा सुरू केला आहे.
निष्पाप कामगारांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित होणे, दुर्घटनेमागील सत्य जनतेसमोर येणे आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या फौजदारी तक्रार अर्जावर पुढे कोणती कार्यवाही होते आणि दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
