पाच टेंडरच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पिंपरी-चिंचवड, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे यांना लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याच्या पाच कामांच्या करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील एकूण ९१ लाख ५७ हजार ६८ रुपये किमतीची पाच टेंडरची कामे घेतली होती. या कामांच्या वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी महापालिकेसोबत करारनामा करणे आवश्यक होते. त्यानुसार करारनामे तयार करून संबंधित कागदपत्रे स्वाक्षऱ्यांसाठी महापालिकेत सादर करण्यात आली होती.
एसीबीच्या प्रेसनोटनुसार, या करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी संबंधित अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी टेंडरच्या रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आहे. त्यानंतर काही फाइल्स मुख्य अभियंता प्रमोद ओभासे यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या.
१९ हजार रुपयांच्या लाच मागणीचे पडताळणीत निष्पन्न
तक्रारदाराने ११ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार त्याच दिवशी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत ओभासे यांनी त्यांच्या टेबलवरील तीन फाइल्समधील ३८ लाख रुपयांच्या टेंडर रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे. यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केल्याचा उल्लेख प्रेसनोटमध्ये आहे.
या प्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७९/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे यांना दुपारी ३ वाजता ताब्यात घेण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी पर्यवेक्षण केले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
महापालिकेच्या प्रशासनात खळबळ
महापालिकेच्या महत्त्वाच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
