चिंचवड महिला अध्यक्षपदी शिल्पा फुलमाळी, तर भोसरीची धुरा सुनंदा दुधाळ यांच्याकडे
पिंपरी-चिंचवड : आम आदमी पार्टीच्या (आप) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून, महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी कविता कोंडे देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तसेच चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षपदी शिल्पा फुलमाळी, तर भोसरी विधानसभा महिला अध्यक्षपदी सुनंदा दुधाळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश समितीच्या वतीने २३ ऑक्टोबर रोजी या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. नियुक्तीपत्रावर महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रकाशजी जरवाल, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक ॲड. सागर पाटील आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणार!
नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ म्हणाले की, या अभ्यासू व कार्यक्षम महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शहरातील आम आदमी पार्टीची महिला आघाडी अधिक मजबूत होईल. महिलांचे प्रश्न, नागरी समस्या आणि महिलांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्यासोबतच पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास या नियुक्त्यांमुळे मदत होईल.
या निवडीबद्दल आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
