राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत!
ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीने बाईक रायडर्सचे स्वागत; ‘नशामुक्त भारत’चा संदेश
पिंपरी, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश देत दक्षिण भारतातून सुरू झालेल्या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जल्लोषाच्या वातावरणात विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सुमारे १०० बाईक रायडर्सनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे, परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्यासह अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी, विविध राज्यांतील बाईक रायडर्स आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही रॅली देशाच्या विविध भागांतून प्रवास करीत असून, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील एकतानगरमध्ये पोहोचणार आहे.
राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाच्या अखंडतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे. डी. वाय. पाटील महाविद्यालय परिसरात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून राष्ट्रीय एकात्मता आणि नशामुक्त भारताच्या संदेशाला युवकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे अधोरेखित झाले.
‘अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!’ हा संदेश देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रॅलीतील सर्व रायडर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
