‘चाईल्ड फ्रेंडली बस’चा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शुभारंभ
पिंपरी-चिंचवड, : बालकांचे हक्क, सुरक्षित बालपण आणि त्यांच्या संरक्षणाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ या अभिनव जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात उत्साहात करण्यात आला.
विशेष बाल पोलीस पथक आणि होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते चाईल्ड फ्रेंडली बसचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य मा. शुभांगी तांबट तसेच होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने काम करावे.यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बालकांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली. बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि बालस्नेही शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरभर फिरणार ‘चाईल्ड फ्रेंडली बस’
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते चाईल्ड फ्रेंडली बसला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ही बस पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत फिरून बाल हक्क संरक्षण, बालकांची सुरक्षितता, सुरक्षित बालपण आणि बालकांशी संबंधित विविध विषयांवर जनजागृती करणार आहे.
बालस्नेही शहर निर्माण करण्याच्या अभियानाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेली ही चाईल्ड फ्रेंडली बस बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्यासह नागरिकांमध्ये बाल हक्कांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ तथा विशेष बाल पोलीस पथकाचे नोडल अधिकारी सुदर्शन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घार्गे (भरोसा सेल) यांच्यासह विशेष बाल पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
