नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; ‘रेशन कार्ड मोबाईलवर’च्या कल्पनेचे केले कौतुक
पिंपरी-चिंचवड | दि. १७ सप्टेंबर २०२६..…शासन आणि प्रशासनाबाबतच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर प्रश्नांचा भडिमार केला आणि मंत्र्यांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत संवाद साधला. चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेला हा अनोखा संवाद विद्यार्थ्यांसाठी शासनव्यवस्था जवळून समजून घेण्याची अनोखी संधी ठरला.
पुणे दौऱ्यावर असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘सर, दाखले मिळायला एवढा वेळ का?’ विद्यार्थ्यांचा थेट सवाल
संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी महसूल विभागाच्या कामकाजापासून नागरिकांना मिळणाऱ्या विविध दाखल्यांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले. एका विद्यार्थ्याने जन्म दाखला, रहिवासी दाखला आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी आणखी कमी करता येईल का?, असा सवाल केला.
तर एका विद्यार्थिनीने रेशन कार्ड डिजिटल करून ते थेट मोबाईलवर उपलब्ध करून द्यावे, अशी कल्पक सूचना केली. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांमधून त्यांची प्रशासनाविषयीची जागरूकता आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
‘रेशन कार्ड मोबाईलवर’च्या कल्पनेला मंत्र्यांची दाद
विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण प्रश्नांचे कौतुक करताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासनाच्या डिजिटल उपक्रमांची माहिती दिली. शासनाच्या आयटी विभागामार्फत डेटा सेंटर आणि डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्याचे काम सुरू असून, रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देण्याच्या सूचनेवर शासन स्तरावर काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना शासन व्यवस्था, प्रशासन आणि नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रश्न थेट महसूल मंत्र्यांसमोर मांडता आले. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि कल्पक सूचनांचे बावनकुळे यांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे यांच्यासह आमदार विक्रांत पाटील, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, समीर जेऊरकर, डॉ. प्रिया गोरखे, तसेच नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विचारले प्रश्न… मंत्र्यांनी दिली उत्तरे… आणि प्रशासनाशी थेट संवादाचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच संस्मरणीय ठरला.
