जाधववाडीत मध्यरात्री थरार; पोटात गोळी अडकली, दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील जाधववाडी येथे आर्थिक देवाण-घेवाणीच्या जुन्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री साडेअडीचच्या सुमारास घडली. गोळी पोटात लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७) आणि रोशन पिंगळे (वय २८, दोघे रा. मधला पेठ, जाधववाडी, चिखली) यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारात रवी धनाजी घोगरे (वय २६, रा. जांभुळकर चौक, जाधववाडी, चिखली) हा तरुण जखमी झाला असून त्याने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी घोगरे आणि आरोपी स्वप्नील जाधव हे मित्र आहेत. सोमवारी मध्यरात्री रवी जाधववाडी येथे आला असताना तेथे स्वप्नील जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे उपस्थित होते. यावेळी जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून रवी आणि स्वप्नील यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर स्वप्नील जाधव याने रवीला धमकी देत पिस्तुलातून त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी रवीच्या पोटाला लागली आणि पोटातच अडकली. घटनेनंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत तसेच घटनेमागील नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे करीत आहेत.
