औंधमध्ये उत्साहात सत्कार; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून नव्या पदाची सुरुवात
पुणे : रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड (आठवले गट)च्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी बाणेर परिसरातील युवा कार्यकर्ते अमोल शेलार यांची निवड करण्यात आली. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सतीशराव केदारी यांनी शेलार यांची नियुक्ती केली.
या निवडीबद्दल औंध येथे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते रमेश ठोसर यांच्या पुढाकाराने अमोल शेलार यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमापूर्वी औंध डी.पी. रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर औंध येथील ज्येष्ठ नागरिक मा. भीमराव चव्हाण यांच्या हस्ते अमोल शेलार यांना शाल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
बाणेर परिसरातील युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या अमोल शेलार यांच्यावर पक्षाने पुणे शहर कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या माध्यमातून कामगार, युवक तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन रमेश ठोसर, रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते व बहुजन उद्धारक सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी पैलवान निलेश ठोसर, गौतम राक्षे, सूसगावातील सामाजिक कार्यकर्ते विवेक निकाळजे, अविनाश निकाळजे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
