जुनी सांगवीतील दुर्दैवी घटना; मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता
जुनी सांगवी, दि. ५ सप्टेंबर २०२६ : दहीहंडी उत्सवाची सांगता झाल्यानंतर मंडपासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर उतरविताना त्याचा भाग अचानक कोसळून एका महिलेच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जुनी सांगवी परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले मोठे लोखंडी स्ट्रक्चर काढण्याचे काम करीत होते. त्यावेळी स्ट्रक्चरचा एक भाग अचानक घसरून खाली कोसळला. याचवेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सलमा पठाण यांच्या डोक्यावर लोखंडी भाग आदळला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता
या घटनेतील आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. मुलगा मंडळाशी संबंधित असल्याने पठाण कुटुंबीयांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार देण्यास नकार दिल्याचे समजते.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःहून दखल घेत अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुटुंबीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
उत्सवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे सार्वजनिक उत्सवांसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या मंडप आणि लोखंडी संरचनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंडप उभारताना तसेच उत्सव संपल्यानंतर संरचना हटविताना प्रशिक्षित मनुष्यबळ, योग्य सुरक्षा उपाय आणि आवश्यक खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे.