‘विज्ञान आणि समाज’ विषयावरील तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
अमरावती/नांदगाव (खंडेश्वर), दि. २ सप्टेंबर व,प्रतिनिधी,नितेश कानबाले….तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत नांदगाव (खंडेश्वर) येथील वाय. ई. एस. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. स्कूल ऑफ स्मार्ट किड्स, नांदगाव (खंडेश्वर) येथे बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीच्या विज्ञान नाट्योत्सवासाठी ‘विज्ञान आणि समाज’ हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा समाजजीवनावर होणारा परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव यांचे प्रभावी सादरीकरण आपल्या नाट्यप्रयोगातून केले. वाय. ई. एस. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आणि शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.
या विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन तालुका विज्ञान मंडळ, नांदगाव (खंडेश्वर)चे अध्यक्ष देवेंद्र झेले सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अयूब शाह सर होते. प्रमुख अतिथी म्हणून दहिकर मॅडम व श्री. रामटेके सर उपस्थित होते.स्पर्धेतील नाट्यप्रयोगांचे परीक्षण मेश्राम मॅडम व दहिकर मॅडम यांनी केले.
वाय. ई. एस. इंग्लिश स्कूलने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. नारायण सोनोने सर तसेच शिक्षकवृंदाने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.