पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन; ‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’चे वितरण
पिंपरी चिंचवड, दि. २ सप्टेंबर २०२६ : अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवक व विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. गणेशोत्सवातील देखावे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत प्रभावी जनजागृती करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजित ‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’ पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखणे, शासन-प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे, तसेच सामाजिक प्रबोधन व जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
यंदा उत्कृष्ट देखावे तसेच शिस्तबद्ध व उल्लेखनीय मिरवणुका आयोजित करणाऱ्या १४ सार्वजनिक गणेश मंडळांचा पुरस्कार व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांचे सुमारे १,००० पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
‘श्री मोरया पुरस्कार-२०२५’चे मानकरी
पोलीस आयुक्तालय स्तर :….
प्रथम — मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण
द्वितीय — सुवर्ण मित्र मंडळ, क्रीडा व कला मंच, पिंपरीगाव
तृतीय — सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन
परिमंडळ-१ :…..
प्रथम — एस.के.एफ. गणेश उत्सव मंडळ, चिंचवड
द्वितीय — भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव
तृतीय — स्वराज्य मित्र मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी
परिमंडळ-२ :….
प्रथम — सम्राट मित्र मंडळ, थेरगाव
द्वितीय — शिवतेज मित्र मंडळ, उर्स शिरगाव
तृतीय — गणेश तरुण मित्र मंडळ, तळेगाव दाभाडे
परिमंडळ-३ :…
प्रथम — नवयुग मित्र मंडळ, गोल्डन चौक, चाकण
द्वितीय — जय गणेश प्रतिष्ठान, आळंदी
तृतीय — जय बजरंग मित्र मंडळ, जाधववाडी, चिखली
विशेष पुरस्कार :….
आदर्श देखावा — विशाल मित्र मंडळ, थेरगाव-वाकड
आदर्श मिरवणूक — श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, सद्गुरू चौक, रावेत
पोलीस आयुक्तालय स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘श्री मोरया फिरता करंडक’ प्रदान करण्यात आला.
पोलीस आयुक्त चौबे यांनी आगामी गणेशोत्सवात अंमली पदार्थविरोधी संदेशांसोबतच सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य जनहिताच्या विषयांवर संदेशप्रधान देखावे साकारण्याचे आवाहन केले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीही मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावटीचा वापर, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात आगामी गणेशोत्सव-२०२६ संदर्भात सार्वजनिक गणेश मंडळांच्या ऑनलाइन नोंदणीसह पोलीस परवानग्या, विद्युत परवानगी आणि संबंधित प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळांनी दिलेल्या सहकार्याबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन व आभार मानले.
