हलाखीच्या परिस्थितीवर मात करत असिफ मुलानीची उत्तुंग भरारी; बहिणीनेही घेतला त्याच ट्रेडमध्ये प्रवेश
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबियातील दमाम येथे ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असिफने मिळवलेले हे यश मोरवाडी मनपा आयटीआयसह पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
असिफ हा सन २०२१-२३ सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडचा प्रशिक्षणार्थी आहे. आयटीआयच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. त्याच्या गुणवत्तेची दखल घेत त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली. त्यानंतर त्याच कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्याची निवड झाली.
प्रशिक्षणादरम्यान असिफने आपल्या उत्कृष्ट कामकाजासोबतच तांत्रिक कौशल्य, मेहनत आणि प्रामाणिकतेची छाप पाडली. त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करून इनप्रो कंपनीने सौदी अरेबियातील आपल्या मुख्य कंपनीत ज्युनियर डिझायनर पदासाठी त्याची निवड केली आहे. विशेष म्हणजे, सौदी अरेबियातील नोकरीसाठी आवश्यक असलेला सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे.
पालकांचे छत्र हरपले, पण जिद्द कायम
असिफच्या यशामागील संघर्षाची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. पालक हयात नसतानाही आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही त्याने परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या संघर्षातून इतर विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
असिफच्या यशाने प्रेरित होऊन त्याच्या बहिणीनेही मोरवाडी आयटीआयमध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे असिफचा शैक्षणिक प्रवास आणि त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गाठलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही आदर्श ठरत आहे.
परदेशी शिक्षण व रोजगारासाठी नवीन उपक्रम
मोरवाडी मनपा आयटीआयकडून गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येत असून, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली लवकरच विभागांतर्गत ‘परदेशी शिक्षण व रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.
असिफने मिळवलेल्या यशाबद्दल प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक ओव्हाळ आर. एस., निदेशक काळोखे व्ही. व्ही. तसेच सर्व गटनिदेशक व निदेशक यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
— प्राचार्य,
औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८