पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परिमंडळ क्रमांक १ अंतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) दुपारी १२ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यासाठी शिक्षक व शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक विल्यम साळवे, अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम आणि सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग प्रशांत ढोले यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच जनजागृतीमध्ये शिक्षकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडीचे शिक्षक मिलिंद संधान, मॉडर्न कॉलेज, निगडीचे डॉ. सत्यवान कुंभार आणि सरस्वती विद्यालय, आकुर्डीच्या शिक्षिका मोहिनी अनेकर यांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबाबत आपली मते मांडली.
परिमंडळ-१ अंतर्गत विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे १७० ते १८० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमासाठी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार आणि सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी पोलीस प्रशासनासोबतच शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली.
