पिंपरी : शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलीस परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलिस बंदोबस्तात एकूण १९ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.
या आदेशानुसार परिमंडळ-१ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, चिंचवडमध्ये २, संत तुकारामनगरमध्ये ६, दापोडीत ३, तर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनिषा कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
