पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी.…शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, अनधिकृत बांधकामे यांसह अनेक ज्वलंत नागरी प्रश्न चर्चेला असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम्’ म्हणण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. अखेर या गोंधळामुळे सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
वंदे मातरम्च्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका करत, “यातील एकाला जरी वंदे मातरम् पूर्ण म्हणता आले, तर सभा दोन महिने तहकूब करा,” असा खोचक टोला लगावला. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विश्वजीत बारणे यांनीही या घडामोडींवर भूमिका मांडत सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शहराचे प्रश्न बाजूला; राष्ट्रगीतावरून राजकारण
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, वंदे मातरम्च्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभेचे कामकाजच ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न पुन्हा लांबणीवर पडले.
शहरातील ज्वलंत प्रश्नांपेक्षा राजकीय मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. सभागृहात स्वतः गोंधळ निर्माण करायचा आणि त्यानंतर सभा तहकूब करायची, अशी टीकाही विरोधी नगरसेवकांनी केली.
महापौर विरुद्ध पक्षनेते? सभागृहात चर्चेला उधाण
दरम्यान, सभागृहातील गोंधळादरम्यान महापौर रवि लांडगे आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या भूमिकांमध्ये काहीसा फरक जाणवत असल्याची चर्चा रंगली. महापौरांचा कल सभा तत्काळ तहकूब करण्याचा नसल्याचे दिसत असतानाच, प्रशांत शितोळे हे सभा तहकूब करण्यासाठी आग्रही असल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
अखेर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. या प्रकारामुळे महापालिकेच्या सत्ताधारी गोटातील समन्वयाबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
‘शहरवासीयांच्या प्रश्नांची किती काळजी?’
सर्वसाधारण सभा हे शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे प्रमुख व्यासपीठ आहे. मात्र, वंदे मातरम्च्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब झाल्याने “शहरवासीयांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रभावनेशी निगडित संवेदनशील विषयावरून राजकीय श्रेय घेण्याच्या प्रयत्नात शहराच्या मूलभूत प्रश्नांवरील चर्चा लांबणीवर पडल्याची टीका विरोधकांनी केली. त्यामुळे १७ सप्टेंबरला होणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्ष शहरातील प्रलंबित प्रश्नांवर काय भूमिका घेतो, याकडे आता पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.