पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी..प्रभाग क्रमांक १ चिखली परिसरात चिमुकल्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांसह आंदोलन करण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारण्यात आला.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केवळ कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष जमिनीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोणते नियोजन केले, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात अॅनिमल शेल्टर होम उभारण्याबाबत कोणते निर्णय घेण्यात आले, याचा लेखी खुलासा प्रशासनाकडून मागण्यात आला.
तसेच चिखली परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. नसबंदी (Animal Birth Control) करणाऱ्या संबंधित कंत्राटदार अथवा संस्थेवर आतापर्यंत कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली, याची माहितीही मागण्यात आली.
‘पोकळ आश्वासने नकोत, ठोस कृती हवी’
भविष्यात चिखलीसह शहरातील कोणत्याही भागात अशा प्रकारची जीवघेणी घटना घडू नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हिंस्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ हटविण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली.
बाधित चिमुकलीला न्याय मिळण्यासोबतच परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ‘ऑन-फील्ड’ कारवाई करावी. केवळ बैठका घेऊन अथवा आश्वासने देऊन प्रश्न मार्गी लागणार नाही. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष कारवाई सुरू होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
“आता पोकळ आश्वासन नको; ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कृती हवी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.