पै. काळुराम लांडगे यांचा विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीबद्दल सन्मान; गुणवंत कामगारांनी सामाजिक कार्य व वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन
पिंपरी, दि.१८ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरी केंद्राच्या वतीने देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. संत तुकाराम नगर येथे ध्वजारोहण, लहान मुलांना खाऊ वाटप, तिरंगा रॅली तसेच गुणवंतांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सुदाम शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार शिवाजीराव शिर्के आणि मानवी हक्क संरक्षण जागृती पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारीपद दिल्याबद्दल पैलवान काळुराम लांडगे यांचा ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार शिवाजीराव शिर्के आणि अण्णा जोगदंड यांच्या हस्ते शाल, नारळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सुदाम शिंदे म्हणाले, “इतिहास केवळ सांगायचा नसतो, तर तो घडवायचा असतो. तिरंगा ध्वजाचा मान राखत स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांच्या भावना व कार्याचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.”
अण्णा जोगदंड यांनी गुणवंत कामगारांनी पुरस्कार व सन्मान मिळाल्यानंतरही सामाजिक कार्याची धुरा पुढे सुरू ठेवावी, असे आवाहन केले. तरुणाई मोबाईल आणि टीव्हीच्या विळख्यात अडकत असताना त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी गुणवंत कामगारांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के म्हणाले, “देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे भाग्य मला लाभले आणि माझ्या उघड्या डोळ्यांनी तो ऐतिहासिक दिवस पाहिला, याचा मला अभिमान आहे.” गुणवंत कामगारांनी आपल्या मिळेल त्या वेळेत लेखनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या ‘येसूबाई’ या पुस्तकाची नोंद इंडिया बुकमध्ये झाल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अण्णा जोगदंड यांनी “कावळा म्हणतो काव-काव, एक तरी झाड लाव” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावून ते जगवावे, अशी शपथही उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शामराव सरकाळे आणि प्रकाश घोरपडे यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरणात देशप्रेमाची भावना जागवली. मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवणकला वर्गाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी व महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास केंद्र संचालक अनिल कारळे, केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपअधीक्षक प्रवीण सावंत, सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, ह.भ.प. शामराव गायकवाड, कामगार नेते किरण देशमुख, लक्ष्मण शिंदे, किरण हेळकर, शैलेजा आवडे, संगीता क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक अनिल कारळे यांनी केले, तर केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
