‘गोल्डन आवर’मध्ये उपचार मिळाल्याने प्रवाशाची प्रकृती स्थिर
पिंपरी, दि. १६ ऑगस्ट २०२६ : चालत्या पीएमपीएमएल बसमध्ये अचानक प्रकृती बिघडलेल्या ५५ वर्षीय प्रवाशासाठी चालक आणि वाहक देवदूत ठरले. प्रसंगावधान राखत बस थेट डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या परिसरात नेऊन प्रवाशाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळवून दिल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण येथील ५५ वर्षीय पुरुष प्रवासी पिंपरी ते चाकण असा बसने प्रवास करीत होते. सकाळी सुमारे ६.५० वाजता बस पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या गेटसमोर आली असता प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घाम फुटला तसेच छातीत वेदना होऊन प्रकृती खालावल्याचे चालक व वाहकाच्या लक्षात आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक व वाहकाने क्षणाचाही विलंब न करता बस थेट डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या परिसरात नेली. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘गोल्डन आवर’मध्ये प्रवाशाला रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याने त्यांना तातडीने उपचार मिळू शकले.
रुग्णालयात पोहोचताच आपत्कालीन विभागातील डॉक्टरांच्या पथकाला माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी तत्काळ प्रवाशाला कॅज्युअल्टी विभागात दाखल करून प्राथमिक व आवश्यक उपचार सुरू केले.
सध्या संबंधित प्रवाशावर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.चालक आणि वाहकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे ‘वेळीच मदत म्हणजे जीवदान’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.