भोसरी प्रतिनिधी : सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून एका महिलेने तरुणाकडे पैशांची मागणी करत धमकी दिल्याचा तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाने भोसरी येथील एका सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेमाराम लसाराम चौधरी (वय ५८) हे भोसरी येथील डेस्टिनेशन क्षितीज सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा विनोद पेमाराम चौधरी (वय २६) याच्यावर सरोज नागनाथ माने नावाच्या महिलेने तिच्या कानातील सोन्याचा झुमका विनोदच्या दुकानात पडला असून, तो त्याने घेतल्याचा आरोप केला.
तसेच, झुमक्याच्या बदल्यात ५५ हजार रुपये देण्याची मागणी करून पैसे न दिल्यास चोरीची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वी विनोदकडून एक लाख रुपये घेतल्यानंतरही आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, त्याला धमकावण्यासाठी संबंधित महिला एका व्यक्तीसोबत आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या धमकी व कथित मानसिक छळाला कंटाळून विनोद चौधरी याने २७ जुलै रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास डेस्टिनेशन क्षितीज सोसायटीच्या एफ विंगमधील १२ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपविले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.