चाकण, दि. ६ ऑगस्ट: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव घेनंद येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करत ४७ लिटर गावठी दारू जप्त केली.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ००३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूबंदी पथकाचे पोलीस शिपाई नितीन पोपट पाटील (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३५ वाजता वडगाव घेनंद स्मशानभूमी रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रियांका बिरेंद्र राजपूत हिला बेकायदेशीररित्या ४७ लिटर गावठी हातभट्टीची दारू (अंदाजे किंमत ४,७०० रुपये) विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान प्रियांका राजपूत हिने ही दारू मोनिका सेहवाग राजपूत, रा. वडगाव घेनंद स्मशानभूमी रोड, हिच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करीत आहेत.