पिंपरी, दि. ६ ऑगस्ट : कासारवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुण व त्याच्या मित्राला अडवून मारहाण करत ऍक्टिव्हा दुचाकीची तोडफोड केल्याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रेहमान जब्बार सिद्दिकी (वय १९, रा. शिवाजी लांडगे चाळ, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद शेख, अमन बागवान आणि समीर (पूर्ण नाव माहित नाही, तिघेही रा. कासारवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२),११८(१),३२४(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र अभिषेक हे कासारवाडीतील महादेव मंदिर येथून रेल्वे स्टेशनकडे ऍक्टिव्हा (क्र. MH-१४-LV-६५७२) वरून जात असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर समीर याने अभिषेकच्या गालावर चापट मारली, तर तिघांनी मिळून दोघांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
या झटापटीत अभिषेकच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून डोक्यावरही मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच फिर्यादीच्या अॅक्टिव्हा दुचाकीची तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.