हिंजवडी : भविष्यात एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंजवडी फेज-२ येथील इन्फोसिस कंपनीत बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) व्यापक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली.
दुपारी ३ ते रात्री ९.०५ या कालावधीत झालेल्या या सरावात एनएसजीच्या २६ स्पेशल कंपोझिट ग्रुपचे अधिकारी आणि कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सहभागी झाले. विशेष म्हणजे, एनएसजीसोबत संयुक्त प्रशिक्षणासाठी भारतात आलेले १७ अमेरिकन सैन्य दलातील कमांडोही या सरावात सहभागी झाले.
या मॉक ड्रिलमध्ये फोर्स वन, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांचे दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी), जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), हिंजवडी पोलीस ठाणे व वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, एमआयडीसी हिंजवडी अग्निशमन दल, इन्फोसिसचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णवाहिका सेवाही या सरावाचा भाग होत्या.
या सरावादरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथम प्रतिसाद देणाऱ्या पथकाची भूमिका, बाह्य व अंतर्गत सुरक्षा घेरा (आऊटर व इन्नर कॉर्डन), वाहतूक नियंत्रण, बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कार्यपद्धती, तसेच दहशतवादविरोधी कारवाईची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सादर करण्यात आली.
या संयुक्त मॉक ड्रिलला एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इन्फोसिस कंपनीचे एचआर व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
