महात्मा ज्योतिराव फुले आणि
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितले होते, “विद्येविना मती गेली”. त्याच विचाराचा वसा घेऊन आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. पुरंदर तालुक्यातील मठवाडी बेलसर गावातील जिल्हा परिषद शाळेतही असेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू आहे.
ही शाळा म्हणजे केवळ 2 शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांचे कुटुंब आहे. या शाळेत मी आणि माझे पती श्री. विलास दुर्गाडे असे आम्ही दोघेच शिक्षक आहोत. आमची जिद्द मोठी आहे. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये आम्हाला आमचे लेकरू दिसते.
मठवाडी बेलसर – शाळा आणि परिस्थिती….
मठवाडी ही पुरंदरच्या कुशीत वसलेली छोटी वाडी. शाळेत आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक मुले शिकतात. त्यांच्यासोबत 3-4 मुले अशी आहेत ज्यांचे आई-वडील वीटभट्टीवर किंवा ऊसतोडणीला मजुरी करतात. त्यांचे जीवन स्थलांतरित आहे. 6 महिने गावात, 6 महिने बाहेर. अशा परिस्थितीत त्यांचे शिक्षण टिकवणे हे आमच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.
पण आम्ही ठरवले – “मुलगा कोणाचाही असो, शिक्षण सर्वांना समान मिळाले पाहिजे.”
पवन गडकर – पहिले पाऊल ते पहिले अक्षर
इयत्ता पहिलीत _पवन विकास गडकर_ नावाचा परभणीचा मुलगा दाखल झाला. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्यांना स्वतःला शिक्षणाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे “आमचे पोर शाळेत टिकेल का?” अशी त्यांना भीती वाटत होती.
पण पवनने पहिल्याच दिवसापासून आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. एकही दिवस न चुकता तो शाळेत येऊ लागला. जणू त्याला शिक्षणाचीच भूक लागली होती. हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडू लागले. नावही लिहिता न येणारा पवन आता वाचू-लिहू लागला.
पवनच्या आई-वडिलांना कामानिमित्त दिवाळीत साखर कारखान्यावर जावे लागते. जाताना ते काळजीने विचारायचे, “मॅडम, आमच्या पोराला २-३ महिने सांभाळून घेताल ना?
मीही त्यांना धीर द्यायचे, “नक्की सांभाळेन. तुम्ही निश्चिंत जा.” आणि आम्हीही त्याला लाडाने जवळ घेऊन जीव लावायचो,आश्चर्य म्हणजे पवनने कधी अभ्यासात आळस केला नाही. “बाई सांगतील तसे” हीच त्याची शिकण्याची पद्धत.
तो दिवस आयुष्यभर लक्षात राहील.
एकदा पवनचे आई-वडील शाळेत आले. दोघांच्याही डोळ्यात पाणी. म्हणाले, “मॅडम, आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते की आमचे पोर इतके शिकेल. इंग्रजी वाचते, अक्षर इतके सुंदर. गावात लोक विचारतात हे त्याचेच अक्षर आहे का?”
का रडता विचारल्यावर ते म्हणाले, *”तुम्ही आमच्या पोरांना शिकल्यावर आमच्यासारखे कष्ट त्यांच्या नशिबी येणार नाहीत. तुम्ही आमच्या लेकराचे कल्याण केले.”*
तेव्हा मी त्यांना म्हणाले, “भाऊ ,जर या शिक्षणामुळे उद्या तुमच्या हातातील कोयता सुटला आणि या लेकराने तुम्हाला चांगले सांभाळले, तर मला माझ्या कामाची खरी पावती मिळाली असे वाटेल.”
कार्तिक अश्विन भोसले – अंधारातला दिवा…
शाळेत _कार्तिक अश्विन भोसले_ नावाचा आणखी एक विद्यार्थी आहे. *तो पालात राहतो.* त्यांचे घर म्हणजे उघड्या आभाळाखाली टाकाऊ बॅनर पासून बनवलेला निवारा. घरात वीज नाही. वारा-पावसापासूनही नीट संरक्षण नाही. वडील जबाबदारी घेत नाहीत. आई दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम करून घर चालवते.
अशा परिस्थितीत शाळेत येणे आणि शिकणे खूप कठीण. शिवाय बऱ्याचदा कार्तिक डबाही न घेता येतो. रिकाम्या पोटी अभ्यास कसा होणार?
आम्ही दोघांनी ठरवले. या मुलाला आपण आपलेसे करू. आम्ही त्याला दत्तक घेऊन त्याचा सर्व खर्च करून शाळेकडून त्याला सर्व सुविधा दिल्या. आणि मी स्वतः त्याच्या जेवणाची काळजी घेऊ लागले. अनेकदा माझ्या डब्यातील चपाती-भाजी मी त्याला देते. “माझे लेकरू आहे” या भावनेने.
आज कार्तिक वर्गात सर्वात हुशार मुलांपैकी एक आहे. त्याचे वाचन, लेखन आणि गणितातील प्रगती बघून आम्हालाही अभिमान वाटतो.
त्याची आई एकदा भेटली आणि म्हणाली, “मॅडम, तुम्ही माझ्या पोराला शिकवा. तुम्ही खूप जीव लावता त्याला, त्याची दुसरी आईच आहात तुम्ही, तो शिकला तर मला म्हातारपणी आधार होईल.”
मी तिला वचन दिले, “ताई, तुमच्या आधी मी त्याला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा संकल्प केला आहे.”
दोन शिक्षक, एकच ध्येय….
आमच्या शाळेत फक्त दोनच शिक्षक आहोत – मी आणि माझे पती श्री. विलास दुर्गाडे. वर्ग वेगळे, जबाबदाऱ्या वेगळ्या, पण ध्येय एकच – “प्रत्येक मुलाला घडवायचे”.
कमी शिक्षक असले तरी आम्ही वेळेचे नियोजन करून सर्व विषय शिकवतो. स्थानिक मुले असो किंवा मजुरांची 3-4 मुले असो, आम्ही सर्वांना सारख्याच नजरेने पाहतो. कारण सावित्रीबाईंनीही भेद न करता सर्वांना शिकवले.
शिक्षक असण्याचा आनंद…
लोक विचारतात, “इतके का करायचे?”
मी सांगते, पगार हा कर्तव्याचा मोबदला आहे. पण जेव्हा एका अशिक्षित आई-वडिलांच्या चेहऱ्यावर “आमच्या पोराचे भले झाले” हा भाव दिसतो, तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
श्रीमंतांच्या मुलांना शिकवणे सोपे आहे. त्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत. पण ज्या मुलांच्या घरी लाईट नाही, डबा नाही, आई-वडील 6 महिने घरी नाहीत – अशा मुलांना हात धरून वर आणणे, हेच खरे शिक्षण आहे. हेच खरे पुण्य आहे.
पवन आणि कार्तिक सारखी मुले आम्हाला दररोज शिकवतात – “जिद्द असेल तर परिस्थिती आडवी येऊ शकत नाही.”
सावित्रीचा वसा म्हणजे फक्त शाळा काढणे नव्हे, तर प्रत्येक लेकराच्या डोळ्यात ज्ञानाचा उजेड करणे आहे. मठवाडी बेलसर सारख्या छोट्या शाळेतूनही मोठी स्वप्ने घडू शकतात, फक्त तिथे प्रेम आणि मेहनत करणारे दोन हात असावे लागतात.
शेवटी एकच सांगावेसे वाटते….
*”शिकवणे सोपे आहे, पण घडवणे कठीण. आणि जेव्हा एक मातीचा गोळा घडून सुंदर मूर्ती बनतो, तेव्हा शिक्षकाच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रूच त्याची खरी पावती असतात.”*
…..लेखिका: सौ. उल्का विलास दुर्गाडे.
जिल्हा परिषद शाळा, मठवाडी बेलसर, ता. पुरंदर
