पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर आधुनिक सुविधांनी सुसज्ज कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते नूतनीकरण फलकाचे अनावरण व फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार कार्यालयाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून अधिकारी व अंमलदारांच्या कार्यालयीन पोशाखातही बदल करण्यात आला आहे. नव्या पोशाखानुसार पोलीस अधिकाऱ्यांसाठी पांढरा शर्ट व काळी पँट, तर अंमलदारांसाठी फिकट निळा शर्ट, ग्रे रंगाची पँट आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा लोगो असलेला कोट निश्चित करण्यात आला आहे. या बदलामुळे कार्यालयीन शिस्त, एकसमानता आणि व्यावसायिकतेला अधिक बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले. आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड तसेच सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
