पुणे, दि.०४ ऑगस्ट : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी बोपोडी येथील ब्रह्माकुमारीज सेंटरला भेट देत तेथील आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी सेंटरच्या संचालिका लक्ष्मी बहनजी यांनी पत्रकारांचे स्वागत करून सेंटरच्या विविध उपक्रमांचा परिचय करून दिला.
लक्ष्मी बहनजी यांनी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व, मानसिक स्वास्थ्य, मनःशांती आणि सकारात्मक विचारसरणी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच “वर्तमान समय : 10 कोटी नशामुक्त अभियान” या उपक्रमाची माहिती देत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. उपस्थित पत्रकारांकडून नशामुक्त राहण्याची प्रतिज्ञाही करून घेण्यात आली.
यावेळी पत्रकारांनी संवाद साधताना मेडिटेशनमुळे तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक विचार आणि जनजागृती पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत माउंट आबू येथे आयोजित करण्यात आलेल्या मीडिया कॉन्फरन्ससाठी उपस्थित पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदेत देशभरातील माध्यम प्रतिनिधी सहभागी होऊन सकारात्मक पत्रकारिता आणि समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाला व्यसनमुक्त करण्याच्या अभियानात माध्यमे सक्रिय सहभाग घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या मीडिया कॉन्फरन्सचे पुणे जिल्ह्यातील नेतृत्व ब्रह्माकुमारीजचे जिल्हा मीडिया समन्वयक बीके सोमनाथ भाई करत आहेत.
