पिंपरी-चिंचवड, दि. ३ ऑगस्ट : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, जीवघेणा हल्ला, अपघातात मृत्यू, दुचाकी चोरी आणि बेकायदा गॅस रिफिलिंग अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.
निगडी पोलीस ठाणे : दळवीनगर कॉर्नर येथे मिरवणूक पाहून घरी जात असलेल्या २१ वर्षीय युवकावर धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी हल्ला केला. आरोपींनी सिमेंटच्या गोट्याने डोक्यावर वार करून जखमी केले तसेच हाताने मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलीस ठाणे : पिंपळे गुरव येथे रस्त्यावरून जाण्याच्या वादातून चार जणांनी १८ वर्षीय तरुणावर चाकू व कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या खांद्यावर व गळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. एक आरोपी अटक असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
चाकण दक्षिण पोलीस ठाणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी येथे भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. या अपघातात ८२ वर्षीय शांताबाई पांचाळ यांचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय राजश्री पांचाळ गंभीर जखमी झाल्या. ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस ठाणे : कासारसाई येथे विनायक टेमगिरे यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच-१२ डीसी-१५८६) मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे : निघोजे येथील ओमकार गॅस रिपेरिंग सेंटरवर कारवाई करताना घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदा व धोकादायक पद्धतीने छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.