चाकण, दि. २७ जुलै : हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून १६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास मेजवानी हॉटेल ते आयएआय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी अर्जुन लक्ष्मण बेरकर (वय २३, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात वैभव दिनकर भांगरे (वय २९, रा. आरोग्यम हॉस्पिटलजवळ, चाकण, मूळ रा. पिंपळगाव माथा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ सचिन लक्ष्मण बेरकर (वय १६) हा स्कूटीवरून जात असताना पुढे वाहने थांबलेली असल्याने त्याने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला अडवून हाताने, मनगटातील कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुकाळे करीत आहेत.