चाकण द.म्हाळुंगे (प्रतिनिधी): निघोजे (ता. खेड) परिसरात रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव नारायण चोपलवाड (वय ३२, रा. बालंबे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हरिदास दिगंबर उल्लाळवाड (वय ४०) हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर (एमएच-१४ जेसी-५८८३) दुचाकीवरून त्यांची मेव्हणी मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५) आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा देवांश यांना घेऊन निघोजे रोडने जात होते.
इंटेल एस.के. डोंगरवस्ती, हॉटेल पंचरत्नसमोर आल्यानंतर जीजे-२७ टीजी-६२४९ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने निष्काळजीपणे दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मंगल चोपलवाड व तिचा मुलगा देवांश यांचा मृत्यू झाला, तर हरिदास उल्लाळवाड यांच्या कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २८१, १०६(१), १२५(१), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर करीत आहेत.
