चाकण,उत्तर म्हाळुंगे (प्रतिनिधी): उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय नेताजी सुतार (वय २५, रा. महाळुंगे गाव, ता. खेड, जि. पुणे) याने स्वतःच्या नावाने बँक ऑफ बडोदा येथे खाते उघडून ते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी साथीदारांच्या संगनमताने वापरण्यास दिल्याचा आरोप आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या खात्यामार्फत देशातील २७ नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात आली. या खात्यातून एकूण ₹६२,००० जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई समीर शब्बीर महात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ६२४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस पुढील तपास करत आहेत.